अंबाजोगाई प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या सूचनेनुसार तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस शहरातील सुमारे ६० शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालक उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, अपघातांना प्रतिबंध करणे तसेच शालेय वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने चालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वाहनामध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी न बसविणे, अतिवेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन न चालविणे, शाळा व गर्दीच्या परिसरात वेग नियंत्रित ठेवणे, विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणीच चढविणे-उतरविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्य अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन न चालविणे, वाहनाची नियमित तांत्रिक तपासणी करणे, फिटनेस, विमा, परवाना व प्रदूषण प्रमाणपत्र वैध ठेवणे, वाहनात प्रथमोपचार पेटी व अग्निशामक यंत्र ठेवणे, विद्यार्थ्यांशी नम्रतेने व जबाबदारीने वागणे तसेच सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय कोणतीही संशयास्पद बाब अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांवर पुढील आठवड्यापासून विशेष तपासणी मोहीम राबवून मोटार वाहन कायदा व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
या बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब पारवे, गोविंद सारुक आणि त्र्यंबक फड उपस्थित होते. त्यांनी चालकांना शालेय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत, वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या जीवितास सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन केले.
शेवटी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्रत्येक चालकाची सर्वोच्च जबाबदारी असून सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित, शिस्तबद्ध व जबाबदार वाहतूक सेवा द्यावी, तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
