बीड प्रतिनिधी : शहरातील इमामपूर रोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढत एका तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड फायरिंग केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. १२) रोजी समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बीड ग्रामीण पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय २२, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांच्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठ, बीड) यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन सलीम पेट्रोलपंप, इमामपूर रोड येथे येत फिर्यादी व त्याच्या मित्रांना धमकावले. यावेळी आरोपी क्रमांक एकाने पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
गोळीबारानंतर आरोपीने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर मारून त्याला जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दराडे करत आहेत.
