परळी प्रतीनिधी : येथील रेल्वे स्थानकात महिलेची छेड काढून मद्यधुंद अवस्थेत राडा करणाऱ्या आरपीएफ जवानावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुनील कुमार असे या जवानाचे नाव असून, घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून ही कारवाई केली.
परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या सुनील कुमार या जवानाने मद्यधुंद अवस्थेत एका महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने आणि उपस्थित प्रवाशांनी त्याला जाब विचारला. यावेळी परिस्थिती चिघळली आणि संतप्त नागरिकांनी जवानाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संबंधित जवानाची चौकशी केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरपीएफचे सेक्युरिटी कमिशनर सिकंदराबाद नवीन कुमार यांनी तातडीने सुनील कुमार या जवानाला निलंबित केले. त्याचबरोबर त्याची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली असुन कॉन्स्टेबल सुनील कुमार या जवानाचे तडकाफडकी निलंबन केले गेले आहे अशी माहिती परळी वैजनाथ येथील आरपीएफ निरीक्षक संतोष कांबळे यांनी दिली.
