केज प्रतिनिधी : केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला. चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात भरधाव वेगात जाणारी कार पुलाच्या सिमेंट कठड्याला जोरदार धडकल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अधिक माहितीनुसार, केज येथून जवळबन गावाकडे जाणाऱ्या कारमधून तिघे मित्र प्रवास करत होते. शुक्रवार (दि. २८) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही कार चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरातील पुलाजवळ आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि तिघेही वाहनात अडकले.अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार केशव खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५ वर्षे) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८ वर्षे, दोघे रा. जवळबन) यांना मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी झालेले दत्ता तपसे (वय ४३ वर्षे, रा. चंदनसावरगाव) यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
