अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहरातील लातूर रोडवरील साईनाथ स्मार्टसिटी परिसरात भरदिवसा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साईनाथ स्मार्टसिटी, लातूर रोड येथे राहणारे वजनकाटा व्यावसायिक जोतीराम पांडुरंग भिसे (वय ४५) यांनी बँक ऑफ इंडियाच्या अंबाजोगाई शाखेतून दोन लाख रुपये रोख काढले होते. ही रक्कम पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवून त्यांनी ती आपल्या कारच्या डाव्या बाजूच्या सीटवर ठेवली. त्यानंतर घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये कार उभी करून ते जेवणासाठी घरात गेले.
काही वेळाने ते खाली आले असता कारच्या पुढील डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फुटलेली दिसली. कारमध्ये ठेवलेली रोकड असलेली पिशवीही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कारची काच फोडून रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढल्याचे समोर आले.
या चोरीत दोन लाख रुपयांची रोकड लंपास झाली असून, कारच्या काचेचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जोतीराम भिसे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३२४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पिराजी व्यंकटी गुट्टे करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
