अंबाजोगाई | प्रतिनिधी
नीट (NEET-UG) २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अंबाजोगाईतील सजग नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले असून, नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट (NEET-UG) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ अभिजित दिपके यांच्या पुढाकाराने देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले असून, त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस सुरू आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असतानाही केंद्र सरकारने अद्याप या आंदोलनाची गंभीर दखल घेतलेली नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
सोनम वांगचुक हे देशातील ज्येष्ठ पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन अमर हबीब, कालिदास आपेट, सुदर्शन रापतवार, धिमत राष्ट्रपाल, अनिकेत लोहिया, अच्चुत आंगणे, बब्रुवान पोटभरे, ॲड. अजय बुरांडे, दगडू लोमटे, प्रा. शैलेजा बरुरे, प्रा. अरुंधती पाटील, ॲड. सुनील सौंदरमल, प्राचार्य कमलाकर कांबळे, प्रा. डी. जी. धाकडे, वसंतराव मोरे, ॲड. अनंत जगतकर व इतरांच्या वतीने देण्यात आले.
