माजलगाव | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेगाव परिसरात ऊसाच्या शेतात एका ५३ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृताची ओळख कृष्णा गणपत राठोड (वय अंदाजे ५३), रा. मालीपारगाव तांडा, ता. माजलगाव अशी पोलिसांनी अधिकृतरीत्या पटविली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृताच्या अंगावर केवळ बनियन व अंडरवेअर असून दोन्ही हात पाठीमागील बाजूस असल्याचे आढळून आले आहे. या परिस्थितीमुळे मृत्यूबाबत विविध शक्यतांची चर्चा सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, हा मृत्यू हत्या, आत्महत्या किंवा इतर कोणत्या कारणामुळे झाला आहे, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष पोलिसांनी दिलेला नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून पुढील अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
