*अंबाजोगाई प्रतिनिधी*
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशातील प्रसिद्ध अभियंता, पर्यावरणवादी आणि गांधीवादी नेते सोनम वांगचुक यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या १७ दिवसांपासून सुरू केलेल्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ अंबाजोगाई येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परमेश्वर गित्ते.
हे उपोषण शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार असल्याची माहिती पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी दिली.
याबाबत बोलताना गित्ते म्हणाले की, देशात शिक्षण, आरोग्य आणि लोककल्याणाच्या अनेक प्रश्नांवर केंद्र सरकारची भूमिका अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार आणि संवेदनशून्यतेमुळे देशातील अनेक गंभीर प्रश्न अधिक बिकट होत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक नागरिकाने माणूस म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या भावनेतून अन्यायाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाई येथे एकदिवसीय उपोषण आयोजित करण्यात आले आहे.
या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी केले आहे.
