अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहरात दिवसभरात आत्महत्येच्या दोन घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय युवकासह ॲड. एल. एम. दामा यांच्या मृत्यूची घटना घडली आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
विवेकानंद नगर परिसरात युवकाची आत्महत्या
पहिल्या घटनेत अंबाजोगाई शहरातील विवेकानंद नगर, नागझरी परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या आदित्य आंगद गुंजकर (वय २२ वर्षे) या युवकाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्य हा मूळचा नरवाडी, ता. सोनपेठ येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनेनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (स्वाराती) नेण्यात आला.
ॲड. एल. एम. दामा यांच्या मृत्यूने हळहळ
दुसऱ्या घटनेत अंबाजोगाई येथील ॲड. एल. एम. दामा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका युवकासह वकिलाच्या मृत्यूची घटना एकाच दिवशी घडल्याने शहरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
आत्महत्येमागील कारणे अस्पष्ट
या दोन्ही घटनांमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनांबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच सविस्तर तपशील स्पष्ट होणार आहे. अंबाजोगाई पोलीस या दोन्ही घटनांचा अधिक तपास करीत आहेत.
