बीड | प्रतिनिधी
बीड तालुक्यातील पालवन शिवारात रविवारी (दि. २६) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एका शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने मृत्यूचे गूढ अधिकच वाढले असून हत्या की आत्महत्या, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पालवन शिवारातील मस्के यांच्या शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. प्राथमिक पाहणीत मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक (वैद्यकीय व वैज्ञानिक तपास) पथकानेही घटनास्थळी दाखल होत पुरावे संकलित करण्याचे काम हाती घेतले.
प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी कोणताही निष्कर्ष जाहीर केलेला नसून, मृत महिलेची ओळख पटविणे, मृत्यूचे कारण आणि घटनेमागील नेमकी परिस्थिती याचा सर्वंकष तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.
