बीड प्रतिनिधी : राज्याचे पोलीस महासंचालक बीड दौऱ्यावर असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत एका ग्रामरोजगार सेवकाला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
गोविंद सोपान गोरे (वय ५०), ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत बनसारोळा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराच्या घरकुल प्रकरणातील काम करून देण्यासाठी गोरे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर प्रभारी पोलीस उपअधीक्षक सोपान चित्तमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने बनेश्वर मंदिराजवळ सापळा रचला.
यावेळी गोविंद गोरे याला तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई समाधान बीडकर, काचगुंडे, अविनाश गवळी आणि गणेश मेहत्रे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
