परळी वैजनाथ | प्रतिनिधी
शहरातील आपना चौक परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२२) घडली असून, या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपना चौक परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी आपल्या कामानिमित्त बाहेर गेली असता आरोपी अम्रु शेख (रा. रौफ कॉलनी, आपना चौक, परळी) याने तिला अडवले. यावेळी “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला पळवून नेईन,” अशी धमकी देत तिचा हात पकडून ओढत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७८ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.
