नाकाबंदीत पोलिसांना मोठे यश; ८.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई प्रतिनिधी :-
अंबाजोगाई शहर पोलिसांची मोठी कार्यवाही अंबाजोगाई शहर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असलेली ७ गोवंशीय जनावरे आणि एक बोलेरो पिकअप असा एकूण ₹८.६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.०० वाजता गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजी महाराज चौक, लातूर टी-पॉइंट, अंबाजोगाई येथे नाकाबंदी करण्यात आली. सुमारे ४.३० वाजता केज रोडकडून येणारा एमएच ५५ सी ०३८९ क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप अडवून तपासणी करण्यात आली.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ७ गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. जनावरांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नव्हती. तसेच चारा-पाणी न देता त्यांची वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी, वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे नव्हती.
या प्रकरणी सलमान पाशा शेख (वय २२, रा. काळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) आणि दिनेश माधव तिघोटे (वय २२, रा. ईदगाह रोड, बौद्ध नगर, अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान अंदाजे ₹३.६० लाख किमतीची ७ गोवंशीय जनावरे व ₹५ लाख किमतीचा बोलेरो पिकअप असा एकूण ₹८.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला असून जनावरांची पुढील व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे करीत आहेत.
