केज | प्रतिनिधी
केज येथील विलास घुले यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मंगळवारी केज पोलीस ठाण्यासमोर मृतदेह रुग्णवाहिकेतून आणून ठेवल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आरोपींना तातडीने अटक करावी आणि प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विलास घुले यांच्या हत्येला तीन दिवस उलटूनही सर्व आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप करत टाकळी गावातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनामुळे केज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत असून, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी विरेंद्र मिश्रा बीडमध्ये पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.
यापूर्वी आज विधानसभेत परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही विलास घुले हत्येचा मुद्दा उपस्थित करत आरोपींना तातडीने अटक करून गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची मागणी केली होती.
सध्या केज पोलीस ठाणे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. दरम्यान, पोलिसांकडून अद्याप या घडामोडींबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
